राज्यात १६ लाख २९ हजार विद्यार्थ्यांनी दिली सीईटी परीक्षा

पुणे : तंत्र शिक्षण, उच्च शिक्षण, कृषी शिक्षण, कला शिक्षण, वैद्यकीय शिक्षण व आयुष यांच्या अंतर्गत १७ विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा राज्यात १६ लाख २९ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दि. २४ मार्च ते २० मे २०२६ दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. एकूण ७७ सत्रामध्ये २० सीईटी घेण्यात आल्या, अशी माहिती सीईटी कक्षाने दिली.

दरम्यान, यंदाच्या सीईटीसाठी तब्बल १८ लाख १२ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख २९ हजार ४८४ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली असून, १ लाख ८३ हजार ०८१ विद्यार्थी अनुपस्थित होते. राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३४० परीक्षा केंद्रावर ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर जेईई (मेन) च्या दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही मिळाव्यात म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच सीईटी कक्षाने दाेनदा परीक्षा घेतल्या.

एमएचटी सीईटी पीसीएम समूह आणि पीसीबी समूह, एमबीए-एमएमएस या तीन प्रवेश परीक्षा (सीईटी) यंदा दोन वेळा घेण्यात आल्या. यात विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक, तर दुसरी ऐच्छिक होती. ज्या विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्या आहेत, त्याला दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त पर्सेंटाईल (Percentile) असतील तो निकाल प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल, असेही स्पष्ट केले हाेते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 27-05-2026