GT vs RR IPL 2026 Qualifier 2: गुजरात टायटन्स फायनलमध्ये! वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी व्यर्थ, कर्णधार गिलच्या वादळात राजस्थान IPL मधून बाहेर, पराभवानंतर वैभव सूर्यवंशीला अश्रू अनावर

GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : आयपीएल 2026 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुलानपूर येथील मैदानावर झालेला हा रोमांचक सामना पूर्णपणे एकतर्फी ठरवत गुजरातने फायनलचे तिकीट मिळवले.

आता 31 मे रोजी होणाऱ्या महामुकाबल्यात गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होणार आहे, तर या पराभवासह राजस्थान रॉयल्सचे आयपीएल 2026 मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

वैभव सूर्यवंशीची 96 धावांची वादळी खेळी (GT vs RR Qualifier 2 IPL 2026)

दरम्यान, आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ वा हंगाम हा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं गाजवला. न्यू चंडीगड येथील मुल्लानपूरच्या मैदानातील क्वालिफायर २ च्या सामन्यात संकटमोचक होऊन त्याने ९६ धावांची खेळी केली.

आधी शतक हुकलं अन् शेवटी गुजरात टायटन्सच्या संघाने ७ विकेट्सने पराभूत करत राजस्थानचं फायनलचं स्वप्न धुळीस मिळवत त्याची खेळी व्यर्थ ठरली. संघाच्या पराभवानंतर वैभव सूर्यंवशीला भावूक झाला. त्याला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. डगआउटमधील त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

वैभव सूर्यवंशी झाला भावूक, व्हिडिओ व्हायरल

गुजरात टायटन्सने विजय मिळवताच क्षेत्ररक्षणावेळी वैभव सूर्यवंशीने ऑरेंज कॅप चेहऱ्यासमोर धरून आपली निराशा लपवण्याचा प्रयत्न केला. GT च्या खेळाडूंशी हस्तांदोलन केल्यानंतर तो थेट डगआउटकडे निघाला. काही वेळ तो तिथे एकटाच बसलेला दिसला. संघाचे फायनलचे स्वप्न भंगल्याची सल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अखेर त्याला अश्रू अनावर झाले आणि रुमालाने डोळे पुसतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. हा क्षण क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भिडणारा ठरला.

सलग दुसऱ्यांदा शतक हुकले

क्वालिफायर २ च्या लढतीत नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल स्वस्तात माघारी फिरल्यावर वैभव सूर्यवंशी याने पुन्हा एकदा कमालीची खेळी करत ४७ चेंडूत ९६ धावांची खेळी साकारली. त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. सलग दुसऱ्यांदा शतकाच्या उंबरठ्यावर अडखळल्यावरही तो स्वत:वर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. याआधी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तो ९७ धावांवर बाद झाला होता. कमालीची गोष्ट म्हणजे यावेळी तो त्याच पद्धतीने मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. शतकापेक्षा ट्रॉफी मिळवणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, हे त्याने याआधीच्या सामन्यात बोलून दाखवलं होते. ते ध्येय साध्य न झाल्यामुळे तो खूपच भावूक झाला.

शुभमन गिलचे झंझावाती शतक अन् गुजरातचा विजय (GT vs RR Qualifier 2 IPL 2026)

215 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात अतिशय वादळी झाली. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याने मैदानात उतरल्यापासूनच सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. सुदर्शन आणि शुभमन यांनी 167 धावांची सलामीची भागीदारी केली. साई सुदर्शन सलग दुसऱ्या सामन्यात हिट विकेट बाद झाला. या सामन्यात त्याने 32 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. क्वालिफायरसारख्या महत्त्वपूर्ण सामन्यात, शुभमन गिलने कर्णधाराला साजेशी खेळी करत 47 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. पण आर्चरने शुभमन गिलला पायचीत (LBW) बाद केले. त्याने 53 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि तीन षटकारांसह 104 धावा केल्या. त्याने झंझावाती शतक झळकावून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. गुजरातने 7 विकेट्स राखून मिळवलेला हा विजय त्यांच्या फलंदाजीच्या ताकदीची साक्ष देणारा ठरला. आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष 31 मे रोजी होणाऱ्या आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स या हायव्होल्टेज फायनल सामन्याकडे लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 30-05-2026