रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सशुल्क रत्नागिरी पोलिस हेल्थ क्लब येत्या १ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे आधुनिक व्यायाम व फिटनेसच्या सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होणार आहेत.
पोलीस मुख्यालय मैदान येथे उभारण्यात आलेल्या या हेल्थ क्लबची स्थापना पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली असून, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व लक्षात घेऊन हेल्थ क्लबमध्ये विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्टीम बाथ, कार्डिओ विभाग, वजन प्रशिक्षण (Weight Training), बॉक्सिंग सुविधा, कॅलिस्थेनिक्स सुविधा तसेच क्रॉसफिट प्रशिक्षणाचा समावेश आहे.
येत्या १ जूनपासून सुरू होणाऱ्या या हेल्थ क्लबचा लाभ पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार आहे. यासाठी मासिक, सहामाही व वार्षिक शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी, अंमलदार यांना मासिक ५०० रुपये, सहामाही २ हजार ७०० रुपये आणि वार्षिक ५,४०० रुपये, तर सर्वसामान्य नागरिकांना मासिक शुल्क १ एक हजार रुपये, सहामाही शुल्क ५ हजार ४०० आणि वार्षिक शुल्क १० हजार २०० रुपये असे असणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस दल आणि नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, शिस्त व शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 30-05-2026














