मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी पकडले; उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय चालकाविरुद्ध कारवाई
चिपळूण : शिरगाव ते पेढांबे जाणाऱ्या मार्गावरील शिरगाव बाजारपेठ चौकात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या एका २५ वर्षीय परप्रांतीय चालकावर अलोरे-शिरगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या वेळी केलेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून, संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरगाव बाजारपेठ चौकात मध्यरात्री कारवाई :
मिळालेल्या माहितीनुसार, अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरगाव ते पेढांबे जाणाऱ्या रोडवरील शिरगाव बाजारपेठ चौक येथे एक संशयास्पद ट्रक आढळून आला. पोलिसांनी सदर ट्रक (क्र. MH 04 LQ 0050) थांबवून चालकाची चौकशी केली असता, तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले.

अमंलदारांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ :
भरवस्तीतील मुख्य चौकात अशा प्रकारे दारूच्या अमलाखाली अवजड वाहन चालवल्याने रस्त्यावरील इतर वाहनांना तसेच नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच या वाहनाला रोखून चालकाला ताब्यात घेतल्याने संभाव्य दुर्घटना टळली.
चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल :
याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिनेश आनंदा कोटकर (वय ४६ वर्षे, ब.नं. २१३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवार, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २:२२ वाजता ट्रकचालक आरोपी बालकनाथ रामबदन पांडे (वय २५ वर्षे, रा. सुलतानीपूर, पो. बराईपूर, ता. आजम बुरहानपूर, जि. आझमगड, राज्य उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गु.र.नं. १२१/२०२६, मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलीस करत आहेत.













