रत्नागिरी:– रत्नागिरी तहसील कार्यालय परिसरातून दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शासकीय कार्यालयाच्या आवारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योती प्रकाश कदम (वय ५७, रा. तेली आळी, रत्नागिरी) यांनी आपली काळ्या रंगाची ‘यामाहा फॅसिनो’ दुचाकी (क्र. MH-08-AH-3592) तहसील कार्यालयाच्या आवारातील दुचाकी पार्किंगमध्ये लावली होती. २५ मे रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने १५ हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली.
घटना घडल्यानंतर फिर्यादी ज्योती कदम यांनी आसपासच्या परिसरात दुचाकीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकी न मिळाल्याने त्यांनी अखेर ३० मे रोजी रात्री १०.१५ वाजता दाभोळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत असून, चोरट्याचा शोध घेत आहेत. शासकीय कार्यालयाच्या आवारातूनच दुचाकी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 01-06-2026














