रत्नागिरी : लोणावळा येथे 30 मे ते 31 मे दरम्यान ओपन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. देशभरातील साहसी खेळाडूंना एकत्र आणणारी ही स्पर्धा भारतीय क्लाइंबिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.
या स्पर्धेने सहभागी गिर्यारोहकांची शारीरिक ताकद, मानसिक स्थैर्य आणि तांत्रिक अचूकता यांची खरी कसोटी पाहिली. ही स्पर्धा केवळ पदक जिंकण्यापुरती मर्यादित न राहता ताकद, सहनशक्ती, एकाग्रता, वेळेचे व्यवस्थापन आणि मानसिक कणखरपणा यांची परीक्षा ठरली. 17 वर्षांवरील पुरुष व महिला तसेच 17 वर्षांखालील मुला–मुलींच्या गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाने थकवा आणि दडपणावर मात करत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.
या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय व्यासपीठावर रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल करणारी कामगिरी करत दामले विद्यालयचा सहभागी झालेला सृजन सतीश पटवर्धन विशेष लक्षवेधी ठरला.
स्पर्धेत सृजन पटवर्धन यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, मार्ग वाचनाची क्षमता, वेगवान निर्णयक्षमता आणि सातत्यपूर्ण चढाईच्या जोरावर 17 वर्षाखालील गटात तृतीय क्रमांक पटकावून रत्नागिरी व दामले विद्यालयाचा नावलौकिक वाढवला. आव्हानात्मक परिस्थितीत रत्नागिरीच्या या विद्यार्थ्याने दाखवलेली कामगिरी कोकणातील साहसी क्रीडा संस्कृतीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
या यशाबद्दल प्रशिक्षक, सहकारी गिर्यारोहक, क्रीडाप्रेमी, पालक आणि स्थानिक नागरिकांकडून दोन्ही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. योग्य प्रशिक्षण, सातत्य, कठोर सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरही कोकणाचा आणि महाराष्ट्राचा झेंडा नक्कीच फडकावता येईल, असा विश्वास या स्पर्धेने अधिक दृढ केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:11 03-06-2026














