गवत आणि झाडीमुळे समोरून येणारे वाहन दिसेनासे; उबाठा विभाग प्रमुख संतोष जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
साडवली :
देवरुख-रत्नागिरी या प्रमुख मार्गावरील पाटगाव ते बावनदी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात उंच गवत आणि अनावश्यक झुडपे वाढली आहेत. यामुळे हा रस्ता प्रवासी आणि वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. अवघ्या एका महिन्यापूर्वी याच मार्गावर रस्त्यावर अचानक आलेल्या रेड्याच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा गंभीर दुखापत होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक व वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जंगलसदृश स्थितीमुळे जंगली प्राण्यांचा वावर वाढला
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गवत व झाडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की, समोरून येणारे वाहन सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे या वळणदार मार्गावर भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा निर्माण झालेल्या या जंगलसदृश परिस्थितीमुळे रानटी डुक्कर, रेडा यांसारख्या जंगली प्राण्यांचा वावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हा मार्ग पाटगाव, पूर, कर्ली, माळवाशी, आंबव, निवेबुद्रूक, वायंगणे, किरडुवे, तुळसणी, तळेकांटे, पांगरी आणि बावनदी अशा अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवासी ये-जा करत असतात.
आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा
रस्त्यावरील या गंभीर परिस्थितीबाबत कोसुंब जिल्हा परिषद गटाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) विभाग प्रमुख संतोष जाधव (माळवाशी) यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “संबंधित यंत्रणेने आणि बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देऊन रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत व झुडपे तत्काळ हटवावीत. अन्यथा प्रवाशांना आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल,” असा इशारा संतोष जाधव यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 03-10-2026














