महाराष्ट्रातील ३७३ महाविद्यालयांना मागे टाकत पटकावले यश; तब्बल ८ वर्षांनंतर महाविद्यालयाला थिएटर विभागात सुवर्णपदकाचा बहुमान
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘युवा महोत्सव २०२६’ मधील नाट्यकला स्पर्धेत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. तन्वी विजय सावंतदेसाई हिने मराठी एकपात्री अभिनय स्पर्धेत मानाचे सुवर्णपदक (Gold Medal) व करंडक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील तब्बल ३७३ महाविद्यालयांमधून आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर तिने प्रथम क्रमांक पटकावत रत्नागिरी जिल्हा आणि आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला तब्बल ८ वर्षांनंतर नाट्य (थिएटर) विभागात सुवर्णपदक मिळवून देण्याचा ऐतिहासिक पराक्रम तिने केला आहे.
गेल्या वर्षी रौप्य, यंदा सुवर्णवेध :
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तन्वीने चमकदार कामगिरी करत रौप्यपदक (Silver Medal) मिळवले होते. यंदा मात्र आपल्या अभिनयात अधिक निखार आणत तिने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तिने सादर केलेल्या एकपात्री अभिनयाने केवळ परीक्षकच नव्हे तर संपूर्ण सभागृहाची मने जिंकली.
सोशल मीडिया ‘फॉलोअर्स’ आणि अभिनय कौशल्यावर परखड भाष्य :
तन्वीने आपल्या एकपात्री अभिनयामध्ये ‘सखाराम बाईंडर’, ‘चारचौघी’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या अजरामर नाटकातील महत्त्वाच्या पात्रांचे प्रभावी पदर उलगडत एक ऑडिशन देणाऱ्या अभिनेत्रीची व्यथा आणि जिद्द मांडली. सध्या मनोरंजन विश्वात कलाकाराच्या मूळ अभिनय क्षमतेपेक्षा त्याच्या सोशल मीडियावरील ‘फॉलोअर्स’च्या संख्येवरून केली जाणारी निवड आणि कास्टिंग या कटू वास्तवावर तिच्या पात्राने अतिशय टोकदार व विचार करायला लावणारे भाष्य केले.
अभिनय हेच जीवन; प्रेक्षकांच्या अश्रू-हास्यातच खरी पावती :
डिजिटल युगात कलाकार आणि खरा रसिक यांच्यातील बदलत चाललेले नाते मांडताना, अभिनय हे केवळ प्रसिद्धी किंवा लाईक्स मिळवण्याचे साधन नसून ते आपले जगणे आहे, हा विचार तिने ठामपणे मांडला. जुन्या रंगकर्मींच्या परंपरेची साक्ष देत तिने फॉलोअर्सच्या आकड्यांपेक्षा प्रेक्षकांच्या डोळ्यांत उमटणारी दाद अधिक मोलाची असल्याचे सांगितले. स्वतःचा स्वाभिमान जपत प्रामाणिकपणे ऑडिशन्स देत राहण्याचा निर्धार व्यक्त करताना, “पडदा पडल्यानंतर एखाद्या प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आले, ओठांवर हसू उमटले किंवा त्याला स्वतःचे जगणे आपल्या अभिनयात दिसले, तरच कलेचे खरे सार्थक झाले,” असा भावस्पर्शी संदेश तिच्या अभिनयातून पोहोचला.
मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव :
तन्वी सावंतदेसाई हिच्या या दैदिप्यमान यशामागे आर्या वंडकर, ओंकार रसाळ तसेच डॉ. आनंद आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. ८ वर्षांनंतर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या तन्वीवर महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी वर्ग, नाट्य रसिक तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव होत आहे.














