जलयात्रा, जलदिंडी आणि जलपूजेने बोरघर दुमदुमले; पाणी गुणवत्तेचे प्रात्यक्षिक आणि ग्रामस्थांनी घेतली ‘जल शपथ’
मंडणगड : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामपंचायत माहू-बोरघर येथील महसूल गाव बोरघर (ता. मंडणगड) येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जल अर्पण दिन’ अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
जल जीवन मिशन अंतर्गत गावात नव्याने उभारण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण ग्रामपंचायत तसेच ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे करून, गावकऱ्यांना प्रत्यक्ष पाणी व्यवस्थापनाची मालकी व जबाबदारी देण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जलयात्रा, जलदिंडी अन् पाणी टाकीचा जलशृंगार
या कार्यक्रमादरम्यान गावात भव्य जलयात्रा, पारंपरिक जलदिंडी, जलपूजा, जलबंधन आणि जलशृंगार यांसारखे उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. परिसरातील पाण्याच्या टाक्या आणि नळ आकर्षकरीत्या सजवण्यात आले होते. याशिवाय, एफटीके (FTK – Field Test Kit) संचाद्वारे पाणी गुणवत्तेची तपासणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी पाणी बचत, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याची सामूहिक ‘जल शपथ’ घेतली.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रणाली चिले, उपसभापती श्री. दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य श्री. अनिल रटाटे, श्रीमती दीप्ती घडसी, गटविकास अधिकारी (BDO) श्री. राजेंद्र आंधळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता श्रीमती कविता जवादे, शाखा अभियंता श्री. विशाल कदम, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. मयुरेश भवारी, माजी सरपंच श्रीमती बोबले, पाणी व स्वच्छता विभागाचे श्री. जितेंद्र साळवी यांच्यासह बोरघरचे ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गावातील पाणीपुरवठा व्यवस्था दीर्घकाळ सक्षमपणे चालविण्यासोबतच पाणी स्रोतांचे जतन करणे आणि पाण्याचा सुयोग्य वापर करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या जल अर्पण दिनाच्या निमित्ताने देण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 03-10-2026














