Maharashtra Monsoon Withdrawal: मुंबईसह राज्यातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेण्याची शक्यता

यंदा देशात २००१ नंतरचा चौथा सर्वात कमी पाऊस; ३ ऑक्टोबरला मुंबईतून मॉन्सूनची अधिकृत माघार

मुंबई :

यंदा मॉन्सूनवर जगभरातील हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला ‘एल निनो’चा प्रभाव खरा ठरला असून राज्यात अपेक्षेप्रमाणे समाधानकारक पाऊस झालेला नाही. आधीच राज्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना आता मॉन्सूननेही परतीचा प्रवास सुरू केला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी मुंबईतून मॉन्सूनने अधिकृतपणे माघार घेतली आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे.

२००१ नंतरचा चौथा सर्वात कमी पावसाचा हंगाम

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या संपूर्ण मॉन्सून हंगामात देशात सरासरीच्या अवघा ८७.४ टक्के पाऊस झाला आहे. हा २००१ साला नंतरचा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मॉन्सून हंगाम ठरला आहे.

Khabardar diwali fest

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या १३ राज्यांतून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने पूर्ण होईल.

पिण्याच्या पाण्याचा अन् चाऱ्याचा भीषण प्रश्न

राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे राज्य सरकारने आधीच कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यातच राज्यातील अनेक भागांतील विहिरी कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. त्यातच जनावरांच्या चाऱ्याचा भीषण तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकरी आपली जनावरे विकण्याच्या तयारीत आहेत.

आगामी २०२७ मध्ये यापेक्षाही भयंकर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात असल्याने, शासनाकडून दुष्काळ निवारणासाठी व पाणी-चारा उपलब्धतेसाठी तातडीने कठोर आणि महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:20 03-10-2026