शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश
मुंबई/अकोला :
राज्यात यावर्षी केवळ दोन महिनेच पाऊस झाला आणि त्यानंतरच्या दोन महिन्यांत पावसाने पूर्णपणे दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली असून पेरणीचा संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानंतर आता राज्याच्या महसूल विभागाने अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्यात आल्या असून, दुष्काळ निवारणाच्या कामात सर्वांनी पूर्ण वेळ उपस्थित राहण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
दुष्काळग्रस्त भागांचा दौरा; अकोल्यात शेतकऱ्यांच्या भेटी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः सध्या राज्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत परिस्थितीचा थेट आढावा घेत आहेत. आज त्यांनी अकोला जिल्ह्यातील विविध भागांत जाऊन शेतकरी बांधवांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान अकोला येथे विविध अडचणी आणि मागण्यांची निवेदने घेऊन आलेल्या नागरिक व शेतकऱ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. सर्वांचे प्रश्न आणि मागण्या समजून घेतल्यानंतर त्याबाबत तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्याचे कडक निर्देश त्यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश
महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे दुष्काळग्रस्त भागात पंचनामे करणे, मदत वाटप करणे आणि पाणी व चारा छावण्यांचे नियोजन करणे यांसारख्या कामांना गती मिळणार आहे. संकटसमयी प्रशासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास यावेळी महसूल मंत्र्यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:13 03-10-2026














