अन्नाच्या शोधात आणि अनुकूल वातावरणासाठी दरवर्षी हिवाळ्यात भारतात येतात सीगल; पर्यटकांसाठी ठरत आहेत विशेष आकर्षण
दापोली :
थंडीची चाहूल लागताच कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांसोबतच परदेशी पाहुण्यांचीही भुरळ पडू लागली आहे. दापोली तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर हजारो मैलांचा प्रवास करून परदेशी ‘सीगल’ (Seagull) पक्षी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या नयनरम्य पक्ष्यांच्या आगमनाने दापोलीचे समुद्रकिनारे अक्षरशः बहरून गेले असून, हे दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे.
अन्नाच्या शोधात हिवाळ्यात भारतात आगमन
दरवर्षी थंडीच्या दिवसांत अत्यंत प्रतिकूल हवामानापासून बचाव करण्यासाठी, अन्नाच्या शोधात आणि राहण्यासाठी पूरक वातावरण मिळवण्यासाठी हे सीगल पक्षी युरोप आणि आशियाच्या उत्तर भागातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हिंदुस्थानात येतात. दापोलीत सध्या थंडीला सुरुवात झाली असून या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी आणि अथांग समुद्रातील माशांचा आस्वाद घेण्यासाठी हे पक्षी किनाऱ्यांवर स्थिरावले आहेत.
दापोलीतील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
दापोली तालुक्यातील दाभोळ, कोळथरे, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णे, आंजर्ले, आडे, पाडले आणि केळशी या सर्वच प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर या पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहायला मिळत आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर उडणारे, पाण्यावर तरंगणारे आणि पर्यटकांच्या हातातून खाद्य पदार्थ टिपणारे हे सीगल पक्षी पाहण्यासाठी आणि त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सीगल पक्ष्यांच्या या आगमनामुळे दापोलीतील पर्यटन व्यवसायालाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:20 03-10-2026














