रत्नागिरी: पुणे जिल्ह्यात हातभट्टीच्या विषारी दारूमुळे घडलेल्या दुर्दैवी आणि भीषण दुर्घटनेनंतर आता संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आला असून जिल्ह्यात विशेष दक्षता घेतली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हातभट्टी दारूचे पाळेमुळे उपटून टाकण्यासाठी २८ मे २०२६ पासून एक धडक आणि विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत गेल्या काही दिवसांत उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर जोरदार कारवाई करत गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहेत.
३८ गुन्हे दाखल, ३० आरोपींना बेड्या!
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, २८ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या धडक मोहिमेत जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीच्या केंद्रांवर छापे टाकण्यात आले. या धडक कारवाईत आतापर्यंत एकूण ३८ गुन्हे नोंदवण्यात आले असून, अवैध व्यवसायात गुंतलेल्या ३० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तब्बल ११ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या मोठ्या कारवाईत लाखो रुपयांचे साहित्य आणि दारू साठा जप्त केला आहे. यामध्ये खालील मुद्देमालाचा समावेश आहे:
- हातभट्टीची गावठी दारू: १,६४० लीटर
- रसायन (कच्चा माल): २३,४०० लीटर
- गोवा राज्यातील विदेशी मद्य: १७.६४ बल्क लीटर (बेकायदेशीर वाहतूक)
- वाहन: दारूची अवैधरित्या वाहतूक करणारे ०१ वाहन
या संपूर्ण कारवाईत एकूण ११,६६,००५/- रुपये (अकरा लाख सहासष्ट हजार पाच) किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आहे.
“अवैध मद्याविरुद्धची ही धडक मोहीम केवळ तात्पुरती नसून, यापुढेही अशीच तीव्र गतीने सुरू राहील. जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही.” — कीर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी.
नागरिकांना आवाहन: ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा, नाव गुप्त राहणार!
रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री, परराज्यातील (विशेषतः गोवा) अवैध मद्याची वाहतूक, साठा किंवा बनावट माडीची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.
तक्रार करण्यासाठी खालील अधिकृत संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत:
- व्हॉट्सॲप क्रमांक: ८४२२००११३३
- टोल फ्री क्रमांक: १८००२३३९९९९
अवैध मद्यासंदर्भात बातमी किंवा गोपनीय माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, अशी ग्वाही अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावे.














