कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात, गर्भपाताचे किट देण्यासाठी मागितली होती लाच

चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग-१ च्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८) यांना ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी (३ जून २०२६) पंचांसमक्ष ताब्यात घेतले. एका गरोदर महिला तक्रारदाराला गर्भपाताचे किट (गोळ्या) देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

खाजगी कारमध्ये स्वीकारली लाचेची रक्कम

या कारवाईची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार महिला गरोदर असून त्यांना गर्भपात करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी ३ जून २०२६ रोजी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांची भेट घेतली. यावेळी डॉ. मदार यांनी गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट देण्यासाठी ४ ते ५ हजार रुपयांची मागणी केली. या प्रकारानंतर तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) रत्नागिरी युनिटकडे अधिकृत तक्रार नोंदवली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ जून रोजीच दुपारी या प्रकरणाची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान डॉ. कांचन मदार यांनी तक्रारदाराकडे साडेचार हजार रुपयांची लाच मागून ती तातडीने स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने रुग्णालयाच्या आवारात सापळा रचला. डॉ. मदार यांनी त्यांच्या ताब्यातील खाजगी चारचाकी वाहन (क्रमांक MH 08 AX 2618) मध्ये तक्रारदाराकडून ४,५०० रुपयांची लाच स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहाथ ताब्यात घेतले.

रत्नागिरी एसीबी पथकाची तत्पर कारवाई

सध्या पागमळा (चिपळूण) येथील परांजपे स्किम (बी-४०६) मध्ये राहणाऱ्या डॉ. कांचन मदार यांच्यावरील ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रत्नागिरी युनिटचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिद्र जाधव, सपोफौ उदय चांदणे आणि अंमलदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर तसेच चालक प्रशांत कांबळे यांनी ही यशस्वी कामगिरी केली.

लाचेच्या मागणीविरोधात लाचलुचपत विभागाचे आवाहन

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरीतर्फे नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी किंवा शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणताही खाजगी इसम लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

  • टोल फ्री क्रमांक: 1064
  • दूरध्वनी क्रमांक: 02352-222893
  • मोबाईल क्रमांक: 7588941247, 9870474535, 9067035910
  • व्हॉट्सॲप क्रमांक: 7038391064
  • ईमेल: acbratnagiri@gmail.com
  • वेबसाईट: www.acbmaharastra.gov.in