Leopard Attack Lanja: बेनी बुद्रुक येथे बिबट्याचा घरात घुसून हल्ला, दोघे जखमी

◼️ कुसुममळेवाडी परिसरात मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण; तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

लांजा: Leopard Attack Lanja | लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडी परिसरात बुधवारी रात्री बिबट्याने थेट घरात घुसून एका ५२ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक गावातील कुसुममळेवाडी येथे बुधवारी (ता. ३) रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संतोष सुर्वे (वय ५२) हे आपल्या घरात असताना पाठीमागच्या बाजूने आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला शेजारचा १९ वर्षीय तरुणही या हल्ल्यात जखमी झाला असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

घरात घुसून अचानक हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सुर्वे हे बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घरात दैनंदिन कामात व्यस्त होते. यावेळी घराच्या पाठीमागील बाजूने एक बिबट्या थेट घराच्या आत दाखल झाला. सुर्वे यांना काही समजण्याच्या आतच बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सुर्वे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरडा सुरू केला.

मदतीसाठी धावलेला तरुणही जखमी

संतोष सुर्वे यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारा १९ वर्षीय तरुण तातडीने त्यांच्या घराच्या दिशेने धावला. सुर्वे यांना बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच, बिबट्याने आपला मोर्चा या तरुणाकडे वळवला आणि त्याच्यावरही हल्ला केला. या झटापटीत दोघेही गंभीररीषा जखमी झाले आहेत. दरम्यान, इतर ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लाठ्याकाठ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांचा वाढता गोंगाट आणि आरडाओरडा पाहून बिबट्याने दोन्ही जखमींना सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला.

वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

या हिंस्त्र हल्ल्यात जखमी झालेल्या संतोष सुर्वे आणि १९ वर्षीय तरुणाला ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लांजा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सातत्याने वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आता बिबट्याने थेट मानवी वस्तीत आणि घरात घुसून हल्ला केल्यामुळे बेनी बुद्रुक आणि परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 04-06-2026