रत्नागिरी: Konkan MLC Election Reaction | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांनी माघार घेतल्यानंतर रत्नागिरीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. बाळ माने यांच्या या धक्कादायक माघारीवर शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी अत्यंत सडेतोड आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “आज खरा गद्दार कोण, हे रत्नागिरीकरांना पुरते कळाले आहे,” असा थेट घणाघात राहुल पंडित यांनी केला असून, बाळ माने हे रणांगणातून पळ काढणारे उमेदवार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
‘एका बाजूला उमेदवारी, दुसऱ्या बाजूला सेटिंग’
बाळ माने यांनी अर्ज माघारीच्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. यावर बोट ठेवत जिल्हाप्रमुख राहुल पंडित म्हणाले की, बाळ माने यांनी एका बाजूला उबाठा (शिवसेना UBT) गटाची अधिकृत उमेदवारी घेतली आणि दुसऱ्या बाजूला पडद्यामागे नितेश राणे यांच्यासोबत ‘सेटिंग’ केले. माने यांच्या या भूमिकेमुळे आज केवळ महाविकास आघाडीच नव्हे, तर भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते देखील प्रचंड नाराज झाले आहेत, असा दावा पंडित यांनी केला आहे.
‘नितेश राणेंनी शक्ती फुकट घालवली’
या नाट्यमय घडामोडींवर अधिक भाष्य करताना राहुल पंडित यांनी महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “या संपूर्ण प्रक्रियेत नितेश राणे यांनी आपली शक्ती उगाचच फुकट घालवली आहे. मुळात बाळ माने यांच्यासोबत असणारी निम्म्यापेक्षा जास्त मते ही आधीच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या ताब्यात होती. त्यामुळे माने यांच्याकडे कोणतेही मोठे संख्याबळ शिल्लक राहिले नव्हते.”
पराभवाच्या भीतीने काढला पाय
राहुल पंडित यांनी बाळ माने यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे. “बाळ माने यांनी जर आपली उमेदवारी कायम ठेवून ही निवडणूक लढवली असती, तर त्यांना संपूर्ण कोकण मतदारसंघातून केवळ १० ते १२ मते पडली असती, ही वस्तुस्थिती आहे. आपली ही नामुष्की आणि दारूण पराभव समोर स्पष्ट दिसू लागल्यामुळेच बाळ माने घाबरले आणि त्यांनी रणांगणातून पळ काढत उमेदवारी अर्ज मागे घेतला,” अशी टीका पंडित यांनी केली. बाळ माने यांच्या माघारीमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात आता नवा वाद पेटला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 04-06-2026














