◼️ भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; संगमेश्वर पोलिसांची तातडीने कारवाई
संगमेश्वर: Sangameshwar Pocso Case ची एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील पोचरी येथे समोर आली आहे. घरात कोणीही नसताना अल्पवयीन मुलीच्या एकांताचा गैरफायदा घेऊन तिच्याशी अश्लील गैरकृत्य करत विनयभंग करणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाला संगमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन अश्लील चाळे
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मुकेश मोहन देसाई (वय ३५ वर्षे, रा. पोचरी, मधलीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन बालिकेच्या ३६ वर्षीय आईने संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.
ही घटना सोमवार, दिनांक १ जून रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास पोचरी, मधलीवाडी येथील फिर्यादीच्या राहत्या घरात घडली. पीडित मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपी मुकेश देसाई याने घरात प्रवेश केला. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने वाईट हेतूने तिला स्वतःच्या मांडीवर बसवून तिच्या शरीराला आणि गुप्तभागाला स्पर्श करत अश्लील गैरकृत्य केले.
गुन्हा दाखल होताच पोलिसांकडून संशयिताला अटक
या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी बुधवार, दिनांक ३ जून रोजी संध्याकाळी ७:३६ वाजता संगमेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी फिर्यादीवरून संशयित आरोपी मुकेश देसाई याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. ६५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ७४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरवत आरोपीला तात्काळ अटक केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू
या गुन्ह्याची प्राथमिक नोंद महिला सहाय्यक पोलीस फौजदार व्ही. एस. तांबडे यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, या संवेदनशील प्रकरणाचा पुढील सखोल तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 05-06-2026














