◼️ कलम ४(२) मधील दुरुस्ती व पुराव्यांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी; बविआ नेते सुरेश भायजे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची चर्चा
लांजा (रत्नागिरी): Ratnagiri Kul कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बहुजन विकास आघाडीने (बविआ) पुन्हा एकदा प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला आहे. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमचे कलम ४(२) मधील ऐतिहासिक दुरुस्तीनुसार, परिस्थितीजन्य पुराव्यांचा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कुळांच्या सद्यस्थितीचा गांभीर्याने विचार करून गोरगरीब कुळांना न्याय मिळावा, या मागणीचे निवेदन बहुजन विकास आघाडीच्या वतीने लांजा तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती प्रियांका ढोले यांना नुकतेच देण्यात आले.
प्रलंबित प्रश्नांवर ‘बविआ’चा गेली अनेक वर्षे संघर्ष
याप्रसंगी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते सुरेश भायजे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार प्रियांका ढोले यांच्याशी बेदखल कुळांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील बेदखल कुळांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी आणि गोरगरीब, कष्टकरी शेतकर्यांच्या हक्कांसाठी बहुजन विकास आघाडीने गेली अनेक वर्षे फार मोठा संघर्ष केला आहे. वर्ष २००२ आणि २००६ या काळात कुळ कायद्यातील कलम ४(२) मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. मात्र, तरीही महसूल अधिकारी वर्गाकडून स्थानिक कुळांना योग्य तो न्याय मिळत नसल्याची खंत अनेक पीडित कुळांनी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांतील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकार्यांना निवेदने देऊन जाब विचारण्यात येणार असल्याचे बविआने स्पष्ट केले.
काय आहे कलम ४(२) मधील दुरुस्ती?
बहुजन विकास आघाडीने यापूर्वी केलेल्या तीव्र आंदोलनांमुळे शासनाला कायद्यात बदल करणे भाग पडले होते. मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियमचे कलम ४(२) मधील दुरुस्तीनुसार:
“जर एखादी व्यक्ती सातत्याने संबंधित जमीन कसत असल्याचे परिस्थितीजन्य साक्षी पुरावे उपलब्ध असतील, आणि त्या गावचा सरपंच किंवा पोलीस पाटील किंवा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष अन् त्या व्यक्तीच्या जमिनीलगत लागून असलेल्या जमिनीचा लागवडदार, उक्त जमीन त्या व्यक्तीच्या कब्जात असल्याचे आणि ती जमीन १२ वर्षांपेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी अखंडीतपणे कसण्यात येत असल्याचे शपथपत्रावर कथन करत असतील, तर ती व्यक्ती या कलमाच्या प्रयोजनांसाठी अधिकृत ‘कुळ’ असल्याचे मानण्यात येईल.”
या कायदेशीर दुरुस्तीचा आधार घेऊन प्रशासनाने स्थानिक पातळीवर कुळांच्या दाव्यांचा तातडीने निपटारा करावा, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
लांजा तालुक्यातील बविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
लांजा तालुक्यातील कुळांच्या या संवेदनशील प्रश्नावर बविआ नेते सुरेश भायजे, चंद्रकांत परवडी, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अधिवक्त्या (ॲड.) स्मिता मांडवकर, तालुकाध्यक्ष दिलीप चौगले, नंदकुमार आंबेकर आणि संभाजी काजरेकर यांनी बेदखल कुळांच्या केसचे गांभीर्य तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले.
हे निवेदन सुपूर्द करताना प्रकाश मांडवकर, विलास दरडे, वस्ताद घडशी, संजय गोंधळी, आत्माराम करंबेळे, सुभाष मसणे, यशवंत घडशी, सुरेश गावडे, शांताराम गाडे, अजय नेमन, जयवंत खुलम, दीपक निवाते, काशिनाथ पोसकर, प्रभाकर सनगरे, रघुनाथ भितळे, संतोष चांदे, वसंत देवळेकर, मंगेश मोरे, हर्षद तरळ, संदीप घडशी यांच्यासह तालुक्यातील बहुजन विकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 05-06-2026














