Devrukh Traffic Obstruction Case: रस्त्यावर बोलेरो आडवी लावून वाहतुकीस अडथळा; चालकाविरुद्ध देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल

कुंभारगाव एसटी स्टँड परिसरातील घटना; सांगलीतील वाहनचालकावर पोलिसांची कारवाई

देवरूख: कुंभारगाव एसटी स्टँडजवळील चव्हाटा मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर महिंद्रा बोलेरो पिकअप आडवी उभी करून वाहतुकीस आणि नागरिकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात एका वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास घडली.

कुंभारगाव एसटी स्टँडसमोरील प्रकार; पोलिसांच्या गस्तीदरम्यान कारवाई

देवरूख पोलीस ठाणे (साखरपा पोलीस दूरक्षेत्र) येथील पोलीस अंमलदार मनस्वी मंदार पावसकर (वय ३९) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिकंदर शमशुद्दीन मुल्ला (वय ४३, रा. मशीद गल्ली, कोकरूड, ता. शिराळा, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सिकंदर मुल्ला याने आपल्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप (क्रमांक MH 09 GJ 2046) कुंभारगाव एसटी स्टँडजवळील चव्हाटा मंदिरासमोरील रस्त्यावर कोल्हापूरच्या दिशेने आडवी उभी केली होती.

वाहतुकीस अडथळा आणि अपघाताची भीती

गाडी रस्त्यावर अशा प्रकारे आडवी उभी केल्यामुळे सार्वजनिक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना तसेच पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासोबतच अशा निष्काळजीपणे उभ्या केलेल्या वाहनामुळे अपघाताची आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी देवरूख पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८५भारतीय दंड संहितेतील कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 18-08-2026