Khed Bharne Flyover Traffic Obstruction Case: भरणे उड्डाणपुलाच्या भरावावर ट्रक उभा करून चालक पसार; चालकाविरुद्ध खेड पोलिसांत गुन्हा

सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे उड्डाणपुलाच्या भरावावर टाटा कंपनीचा मालवाहू ट्रक धोकादायक पद्धतीने उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महामार्गावर मुंबईच्या दिशेने धोकादायक पार्किंग

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पुरुषोत्तम बाबुराव सालगडे (वय ४१, रा. बोरघर, घोलपवाडी, ता. खेड) याने आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा मालवाहू ट्रक (क्रमांक MH 43 E 7729) भरणे उड्डाणपुलाच्या भरावावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अत्यंत धोकादायक स्थितीत उभा केला होता.

ट्रक सोडून चालक निघून गेला; खेड पोलिसांत गुन्हा नोंद

हा मालवाहू ट्रक काही काळ त्या ठिकाणी उभा करून चालक तेथून निघून गेल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. महामार्गावर अशा प्रकारे निष्काळजीपणे ट्रक उभा करून निघून गेल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आणि अपघाताची शक्यता निर्माण झाली.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Shiva optical

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 18-08-2026