प्रभारी राजवटीनंतर नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती; १७ ऑगस्टला स्वीकारला पदभार; १३ मार्च २०२७ पर्यंत असणार कार्यकाळ
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी सांगली येथील मनीषा न्याणू कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी १७ ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारताच त्यांनी विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेऊन प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
परिवीक्षाधीन प्रशिक्षणानंतर स्वतंत्र पदभार; ३० आठवड्यांचा कालावधी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १३ परिवीक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा संलग्नता टप्प्यात शिक्षणाधिकारी व तत्सम पदांचा स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे.
यानुसार मनीषा कदम यांना १७ ऑगस्ट २०२६ ते १३ मार्च २०२७ या कालावधीत ३० आठवड्यांसाठी रत्नागिरी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा स्वतंत्र पदभार सोपवण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही पदस्थापना करण्यात आली आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांनंतर नियमित नियुक्ती
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू होते. यापूर्वी नीलिमा नाईक, सुनिता शिरभाते यांच्यासह किरण लोहार यांनी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले होते. किरण लोहार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाला गती दिली होती, मात्र शासनाच्या नवीन आदेशानुसार मनीषा कदम यांची नियुक्ती झाल्याने अवघ्या काही दिवसांतच लोहार यांना पदभार सोडावा लागला.
तीन वर्षांसाठी पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी
प्राथमिक शिक्षण विभागातील कामकाज सातत्याने सुरळीत ठेवण्यासाठी या पदावर किमान तीन वर्षांसाठी नियमित शिक्षणाधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी शिक्षण वर्तुळातून होत आहे. सध्याची नियुक्ती १३ मार्च २०२७ पर्यंतच असल्याने त्यानंतर पुन्हा हे पद रिक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नूतन शिक्षणाधिकारी मनीषा कदम यांच्यासमोर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्य आव्हान असणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 18-08-2026














