नवी दिल्ली:
“जेव्हा माझी फ्लाईट दिल्ली विमानतळावर लँड होणार होती, तेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या स्वातंत्र्याचे शेवटचे क्षण जगत आहे. या आंदोलनासाठी आणि देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी माझ्या स्वातंत्र्याची आहुती द्यायलाही पूर्णपणे तयार होतो,” अशा अत्यंत भावनिक आणि आक्रमक शब्दांत ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील ऐतिहासिक जनसागराला संबोधित केले. अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल झालेल्या दिपके यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
अटकेची भीती होती, पण विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य गमावण्यास तयार
आंदोलक तरुणांशी संवाद साधताना अभिजीत दिपके यांनी भारतात येताना असलेल्या अटकेच्या भीतीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ते अटक सोसण्यास आणि स्वातंत्र्य गमावण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत. “आमच्या सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्या जाऊ शकतात, आमचे अकाऊंट्स ब्लॉक केले जाऊ शकतात, पण आमच्या मनातली अन्यायाविरुद्धची आग सरकार कधीच संपवू शकत नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, गेल्या महिन्याभरापासून पेपर लीकची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
सरकारकडून मूळ मुद्द्याला भटकवण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करताना दिपके यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवेजी आणि घोटाळेबाजांवर कडक कारवाई करण्याऐवेजी सरकार आंदोलकांचे सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक करण्यात आणि पोस्ट डिलीट करण्यात आपली ताकद वाया घालवत आहे. हा लढा प्रदीर्घ असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, “या देशातील प्रामाणिक विद्यार्थी आणि तरुण पैशांनी किंवा दबावाने विकला गेलेला नाही. आपले हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि अत्यंत अनुशासित मार्गानेच पुढे जाईल. आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच सरकारला झुकवायचे आहे.”
कडक सुरक्षा व्यवस्थेत जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा एल्गार
अभिजीत दिपके यांचे भाषण ऐकण्यासाठी जंतर-मंतर मैदानावर हजारो तरुणांची प्रचंड गर्दी झाली होती. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके आणि तिरंगा घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आधीच निमलष्करी दलाच्या ४० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, तर परिसरातील इंटरनेट सेवा अंशतः विस्कळीत झाली आहे. असे असूनही, दिपके यांच्या या भाषणामुळे आंदोलक विद्यार्थ्यांचा उत्साह कमालीचा वाढला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 06-06-2026














