Ratnagiri Free Uniform Fund: रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांसाठी १ कोटी ४५ लाखांचा मोफत गणवेश निधी वितरित; ६० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

◼️ पहिल्या गणवेशाच्या ८० टक्के रकमेला मंजुरी; Ratnagiri Free Uniform Fund तालुकास्तरावर पीएफएमएस प्रणालीद्वारे वर्ग

रत्नागिरी: Ratnagiri Free Uniform Fund | रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीत शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. समग्र शिक्षा अभियान आणि राज्यशासन मोफत गणवेश योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ६० हजार ४७६ पात्र विद्यार्थ्यांसाठी पहिल्या गणवेशाच्या मंजूर तरतुदीच्या ८० टक्के निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार प्रतिगणवेश २४० रुपयेप्रमाणे एकूण १ कोटी ४५ लाख १४ हजार २४० रुपये इतका ‘Ratnagiri Free Uniform Fund’ जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर ‘पीएफएमएस’ (PFMS) प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला आहे.

दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनाही मिळणार लाभ

या योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) मधील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील (BPL) पालकांची मुले यांना प्रतिगणवेश ३०० रुपये या दराने दोन गणवेश संचाकरिता ६०० रुपये प्रतिविद्यार्थी तरतूद मंजूर आहे. विशेष म्हणजे, सन २०२३-२४ पासून राज्यशासनाच्या गणवेश योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेवरील (APL) पालकांच्या मुलांनाही या योजनेचा मोठा लाभ दिला जात आहे. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील शासनाने घेतला आहे.

शाळा व्यवस्थापन समितीकडे अधिकार; स्काऊट-गाईडचाही विचार

सध्या पहिल्या संचाचा उर्वरित २० टक्के निधी व दुसऱ्या संचाचा संपूर्ण अनुदान निधी राज्य कार्यालयाकडून प्राप्त होताच स्थानिक पातळीवर वर्ग करण्यात येणार आहे. प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळास्तरावरून गणवेश खरेदीची देयके (Bills) प्राप्त होताच तालुकास्तरावरून संबंधितांना त्वरित रक्कम वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच ‘शाळा व्यवस्थापन समितीमार्फत’ (SMC) केली जाणार आहे. गणवेशाचा रंग आणि त्याची रचना निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये ‘स्काऊट व गाईड’ विषय शिकवला जातो, त्या शाळांना दुसरा गणवेश स्काऊट व गाईड संस्थेने निश्चित केलेल्या अधिकृत रंगसंगतीप्रमाणे खरेदी करण्याचे विशेष अधिकार असतील.

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक, तर मंडणगडमध्ये सर्वात कमी लाभार्थी

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या निधीचे समप्रमाणात वाटप करण्यात आले असून, यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १२ हजार १६६ लाभार्थी विद्यार्थी आहेत, तर सर्वात कमी मंडणगड तालुक्यात २ हजार ९०४ लाभार्थी विद्यार्थी आहेत.

नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच गणवेश वितरणामध्ये कोणताही विलंब होणार नाही आणि एकही पात्र लाभार्थी विद्यार्थी या शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या कडक सूचना जिल्ह्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख, शिक्षणविस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी (BEO) यांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 06-06-2026