रत्नागिरीत स्विगीच्या फूड डिलिव्हरी व्यवस्थेविरोधात कायदेशीर नोटीस; ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

रत्नागिरी : ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीमार्फत रत्नागिरीत अनेक वेळा खाद्यपदार्थ साध्या अॅल्युमिनियम फॉइलमध्ये, कोणतेही टॅम्पर-प्रूफ सील, सुरक्षा स्टिकर किंवा छेडछाड झाल्याचे दर्शविणारी व्यवस्था नसताना वितरित होत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणी सायबर लॉ एक्सपर्ट ॲड. अमित मधुकर नागवेकर यांनी स्विगी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, FSSAI (Food Safety and Standards Authority of India) आणि FDA यांच्या अन्नसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहकांपर्यंत पोहोचणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व टॅम्पर-एव्हिडंट पॅकेजिंगमध्ये असणे आवश्यक आहे. डिलिव्हरीदरम्यान अन्नपदार्थांमध्ये छेडछाड, दूषितीकरण, भेसळ किंवा इतर अनधिकृत हस्तक्षेप होऊ नये यासाठी अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची मानली जाते.

ॲड. अमित नागवेकर यांनी स्विगीकडे रत्नागिरीतील सर्व भागीदार हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची तातडीने स्वच्छता व पॅकेजिंग ऑडिट करण्याची, “Swiggy Seal” प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची तसेच गेल्या एका वर्षातील हायजीन ऑडिट अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

“ही बाब केवळ एका ग्राहकाची तक्रार नसून सार्वजनिक आरोग्य आणि ग्राहक सुरक्षेशी संबंधित आहे. सुरक्षित, सीलबंद आणि मानकांनुसार पॅकेजिंगची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास हजारो ग्राहकांच्या आरोग्यावरील संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो,” असे ॲड. अमित नागवेकर यांनी म्हटले आहे.

स्विगीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ग्राहक आयोग, FDA, FSSAI तसेच अन्य सक्षम प्राधिकरणांकडे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:04 08-06-2026