डॉक्टर मदार यांच्या न्यायालयीन जामिनानंतर आरोग्य विभागाकडून चौकशी गतिमान
रत्नागिरी: कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्भपाताचे किट (गोळ्या) देण्याच्या बदल्यात एका गरोदर महिलेकडे ४ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. ‘Ratnagiri ACB Trap’ च्या या कारवाईनंतर जिल्हा रुग्णालय आरोग्य प्रशासनाने डॉ. मदार यांच्या निलंबनाचा सविस्तर प्रस्ताव मंजुरीसाठी आरोग्य उपसंचालकांकडे पाठवला आहे. डॉ. मदार या वर्ग-२ (अ गट) श्रेणीतील वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाचे कायदेशीर अधिकार उपसंचालक स्तरावर आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अटकेनंतर डॉ. मदार यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यावरील लाचखोरीचे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. शासकीय नियमांनुसार गर्भपाताच्या गोळ्या देण्यासाठी एक विशिष्ट आणि काटेकोर वैद्यकीय प्रक्रिया राबवणे अनिवार्य असते. असे असताना डॉ. मदार या कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करून गैरमार्गाने या गोळ्यांचे वाटप करत होत्या का, या संशयावरून आता आरोग्य विभागाकडून अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८, रा. पागमळा, चिपळूण) यांना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ जून रोजी सायंकाळी लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. या प्रकरणातील तक्रारदार गरोदर महिला असून त्यांना वैद्यकीय कारणास्तव गर्भपात करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी रुग्णालयात डॉ. मदार यांची भेट घेतली असता, डॉ. मदार यांनी शासकीय औषध देण्यासाठी सुरुवातीला ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार महिलेची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी थेट रत्नागिरी ‘एसीबी’ कार्यालयात जाऊन या भ्रष्टाचाराची रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, डॉ. मदार यांनी तडजोडीअंती ४ हजार ५०० रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरताच एसीबीच्या पथकाने कामथे रुग्णालय परिसरात सापळा रचला.
डॉ. मदार यांनी तक्रारदार महिलेकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी शासकीय दालन न वापरता आपले खाजगी वाहन (क्रमांक MH 08 AX 2618) निवडले. या कारमध्ये लाचेची रोख रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष डॉ. मदार यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण लाचखोरीप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 09-06-2026














