राजापूर आगारात नव्या पाच राजमाता जिजाऊ बस दाखल

राजापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. एस.टी. ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी महामंडळाने यापुर्वी लालपरी व आता नवीन राजमाता जिजाऊ एस.टी. बस महामंडळाच्या सेवेत आणल्या आहेत. राजापूर आगाराला रत्नागिरी विभागिय कार्यालयाकडून पाच राजमाता जिजाऊ गाडया प्राप्त झाल्या आहेत. यामुळे आता राजापुरातील प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री म्हणून कार्यभार घेतल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एस.टी. प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देताना त्यांनी एस. टी. महामंडळाच्या ताफ्यात नवीन गाडया आणण्यावर भर दिला आहे. यापुर्वी राज्यातील सर्व आगारांमध्ये लालपरी या नवीन बस देण्यात आल्या. आता त्यानंतर नवीन राजमाता जिजाऊ बस देण्यात आल्या आहेत.

राजापूर आगाराला यापुर्वी दहा लालपरी या नवीन बस उपलब्ध झाल्या होत्या. आमदार किरण सामंत यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. आता पुन्हा एकदा नवीन राजमाता जिजाऊ या नवीन पाच बस राजापूर आगारात रविवारी दाखल झाल्या आहेत. यासाठी आ. किरण सामंत यांनी विशेष लक्ष घातले होत. रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडून राजापूर आगाराला या पाच नवीन राजमाता जिजाऊ बस देण्यात आल्या.

भगव्या सफेद रंगाचा पट्टा असेलेली व २ बाय ३ अशी प्रवाशी आसन व्यवस्था असलेल्या या राजमाता जिजाऊ बस मध्ये ५५ इतकी प्रवाशी आसन व्यवस्था आहे. तर या बस मध्ये देखील प्रवाशांना मोबाईल चार्जिंगसाठी आसनाच्या लगतच चार्जिंग पॉईंट सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा विशेष फायदा होणार आहे.

राजापूर आगारात या पाच नवीन राजमाता जिजाऊ बस उपलब्ध झाल्याने आगार प्रशासन व प्रवाशांनाही दिलास मिळणार आहे. या नवीन राजमाता जिजाऊ बस प्रारंभी राजापूर रत्नागिरी या मार्गावर व त्यानंतर विभाग नियंत्रकांच्या आदेशान्वये लांब पल्ल्याच्या मार्गावर या बस सोडण्यात येतील अशी माहिती राजापूर आगार प्रमुख अजित गोसराडे यांनी दिली.

राजापुर आगाराला आणखी लालपरी दहा व राजमाता जिजाऊ पाच नवीन गाडया उपलब्ध झाल्यास राजापूर आगाराची प्रवाशी सेवा अधिक चांगली होणार आहे. यासाठी आ. किरण सामंत यांचा पाठपुरावा सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:32 09-06-2026