रत्नागिरी : शिपोशी (ता. लांजा) येथील एका हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणाने ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून फूस लावून पळवून नेल्याचा गंभीर आरोप करत, संतप्त हिंदू बांधवांनी लांजा पोलीस ठाण्यावर धडक दिली.या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीशी प्रेमाचे नाटक केले. तिला ब्लॅकमेल करून, विविध प्रलोभने दाखवून आणि तिच्या पालकांबद्दल तसेच हिंदू धर्माबद्दल अपप्रचार करून तिला फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या ही तरुणी दबावाखाली बोलत असून तिच्या जीविताला धोका असल्याचे तिच्या पालकांचे आणि परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे हिंदू समाजामध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित हिंदू मुलीला त्वरित तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात संबंधित मुस्लिम तरुणाला मदत करणाऱ्या लांजा येथील स्थानिक हिंदू तरुण आणि इतर संशयित व्यक्तींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या आशयाचे निवेदन लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना सादर करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 10-06-2026














