Khed Road Accident: सुकवली-क्रशर परिसरात डंपर ३५ फूट खोल दरीत कोसळला; चालकाचा मृत्यू

रिव्हर्स घेताना अंदाज चुकल्याने खडी वाहतूक करणारा डंपर दरीत कोसळून तरुणाचा अंत

खेड (रत्नागिरी): खेड तालुक्यात सुकवली-क्रशर परिसरात आज बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. खडी वाहतूक करत असलेला डंपर रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने हा डंपर तब्बल ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळला. या अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुण चालकाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि डंपर थेट दरीत प्राप्त माहितीनुसार, एमएच ०८ डब्ल्यू ८४७१ (MH 08 W 8471) या क्रमांकाचा डंपर सुकवली-क्रशर परिसरात खडी वाहतुकीचे काम करत होता. बुधवारी सकाळी सुमारे ११:४० वाजण्याच्या सुमारास हा डंपर रिव्हर्स घेण्याचे काम सुरू होते. मात्र, याच दरम्यान चालक नितीन विजय पवार (वय २७ वर्षे, रा. चिंचघर-दस्तुरी) याचा वाहनावरील ताबा सुटला. कडेचा अंदाज न आल्यामुळे हा जड डंपर थेट रस्त्यालगत असलेल्या खोल दरीत कोसळला. डंपर एवढ्या उंचावरून खाली पडला की, त्याचा मोठा चक्काचूर झाला असून चालक नितीन पवार यांचा घटनास्थळीच प्राण गेला.

नरेंद्राचार्यजी संस्थानच्या रुग्णवाहिकेची तातडीने मदत अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली ‘जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान (नाणीजधाम)’ यांची २४ तास विनामूल्य अपघात मदत सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू केले. दरीतून मृत चालकाचा देह बाहेर काढून पुढील प्रक्रियेसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची स्थानिकांची मागणी या भीषण अपघातामध्ये नितीन पवार या २७ वर्षीय तरुणाने आपले प्राण गमावल्यामुळे चिंचघर-दस्तुरी परिसरासह संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ऐन तरुण वयात कुटुंबातील कमावता मुलगा गेल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघात प्रकरणाचा आणि त्यामागील तांत्रिक बाबींचा सविस्तर तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे. दरम्यान, सुकवली-क्रशर परिसरातील अशा धोकादायक ठिकाणी प्रशासनाने तातडीने रक्षक कठडे किंवा सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी आग्रही मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:08 10-06-2026