उकाड्यामुळे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला
खेड (रत्नागिरी): खेड शहर आणि भोस्ते गावाच्या सीमेवरून वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे या तीन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ओढवला प्रसंग प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या तीव्र उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी हे तरुण जगबुडी नदीच्या पात्रात उतरले होते. खेड शहर आणि भोस्ते गावाच्या दरम्यान असलेल्या एका अत्यंत खोल डोहाच्या ठिकाणी हे सर्वजण आंघोळ करत होते. मात्र, नदीच्या या भागातील पाण्याचा वेग आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्यामुळे चौघेही अचानक पाण्यात बुडू लागले.
एकाला वाचवण्यात यश, तिघे प्रवाहात बेपत्ता नदीत बुडत असताना तरुणांनी वाचण्यासाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूला असलेल्या यंत्रणा आणि नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत सुदैवाने एका तरुणाला वेळेत पाण्याबाहेर काढण्यात यश आले असून तो सुखरूप आहे. मात्र, पाण्याचा ओढ जास्त असल्याने आकाश, नरेश आणि कैलास हे तिघे जण पाण्याच्या खोल प्रवाहात बुडाले. दुर्घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी नदीकाठावर धाव घेतली. तरुणांच्या अकाली जाण्याने नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचेही डोळे पाणावणारा होता.
खेड पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा आणि तपास सुरू या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवून घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला आहे. खेड पोलीस याप्रकरणी अधिक कायदेशीर तपास करत आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी, धरणे किंवा डोहाच्या ठिकाणी तरुण मुलांची गर्दी होत असते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता अशा ठिकाणी उतरणे किती धोकादायक ठरू शकते, हेच या दुर्दैवी घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:08 10-06-2026














