Ratnagiri Monsoon Rain: रत्नागिरीत ‘मान्सून’च्या पावसाची उसंत; उष्म्यात वाढ

◼️ जिल्ह्याला यलो अलर्ट कायम; २४ तासांत २२८.२७ मिमी पावसाची नोंद, सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात

रत्नागिरी: जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने जोरदार एन्ट्री केली असून सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. मात्र, बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून पावसाने अचानक उसंत घेतल्याने जिल्ह्यात पुन्हा उष्मा कमालीचा वाढला आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या सरींमुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यानंतर अचानक पडलेल्या या उघडिपीमुळे उन्हाचा चटका आणि हवेतील आर्द्रता वाढली असून, घामाने रत्नागिरीकर चांगलेच हैराण झाले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला ११ जूनपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

२४ तासांत २२८.२७ मिमी पावसाची नोंद; सर्वदूर हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात, तर सोमवारी तीन ते चार तालुक्यांत मान्सूनने हजेरी लावली होती. त्यानंतर आता संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण २२८.२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुरुवातीला कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांना असह्य उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला होता आणि वातावरणात चांगला गारवा निर्माण झाला होता.

रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यात सर्वाधिक पाऊस

तालुकावार आकडेवारीचा विचार केला असता, या २४ तासांत सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात ७० मिलीमीटर इतका नोंदवला गेला आहे. त्याखालोखाल गुहागर तालुक्यात ६० मिलीमीटर आणि संगमेश्वर तालुक्यात ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या उलट, उत्तर रत्नागिरीतील मंडणगड आणि खेड तालुक्यात या कालावधीत सर्वात कमी पाऊस पडल्याचे समोर आले आहे.

पावसाच्या लपंडावामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त

बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून आकाश अंशतः मोकळे झाले आहे. पावसाच्या या उसंत घेण्यामुळे आणि ढगाळ हवामानामुळे किनारपट्टीच्या भागात कमालीचा उष्मा वाढला आहे. घामाच्या धारांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पावसाचा पुढील मोठा स्पेल कधी सुरू होतो याकडे आता रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 11-06-2026