Ratnagiri ST Bus Accident: खेडशी येथे एसटीच्या धडकेत वासराचा मृत्यू

चिपळूणच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी: Ratnagiri ST Bus Accident | रत्नागिरी शहरानजीक असलेल्या खेडशी येथे एक दुर्दैवी अपघात समोर आला आहे. चिपळूणहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसने रस्त्याच्या कडेला असलेल्या गायीच्या वासराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वासराचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

भरधाव आणि निष्काळजीपणे बस चालवल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी (ता. ११) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खेडशी येथील श्रीराम फायनान्स गोडावूनच्या अगदी समोर घडला. मुरलीधर पुंडलिकराव चांभारे (रा. चिपळूण, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. चालक मुरलीधर चांभारे हे एसटी बस (क्रमांक एमएच-२०-बीएल-३५७७) घेऊन चिपळूण येथून रत्नागिरीकडे येत होते. बस खेडशी परिसरात आली असता, चालकाने वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वासराला धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की, वासराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू

या अपघातप्रकरणी गणेश विजय गायकवाड (वय ४२, रा. लक्ष्मीनारायण नगर खेडशी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकारणी एसटी चालकावर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार टेमकर यांच्याकडून केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 13-06-2026