गुहागर | प्रतिनिधी : सिंधूरत्न समृद्धी योजना २.० या महत्वकांक्षी शासकीय योजनेकरिता रत्ना जिल्हाकरिता भाजपचे गुहागरचे माजी आमदार व नेते विनय नातू यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा करिता दीपक केसरकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शासनाने एका परिपत्रिकाने ही निवड जाहीर केली असून डॉक्टर विनय नातू यांच्या नियुक्तीबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून या जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने या दोन जिल्ह्यांसाठी ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ ही योजना सन २०२६-२७ ते २०२८-२९ या ३ वर्षासाठी राबविण्यास संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. संदर्भाकीत शासन निर्णयातील परिच्छेद ५ मध्ये ‘सिंधुरत्न समृध्द योजना २. ०’ करिता ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ भाग-२ अंतर्गत स्वतंत्र आराखडा तयार करणे व त्याची कालबध्द अंमलबजावणी करण्याकरिता सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्याकरिता दोन स्वतंत्र ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’ गठित करण्यात आल्या आहेत. सदर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्याकरिता गठित केलेल्या दोन स्वतंत्र ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’ च्या संरचनेमध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती ‘उपाध्यक्ष’ असेल अशी तरतूद आहे. सदर तदतूदीच्या अनुषंगाने ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ अंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांकरिता दोन स्वतंत्र गठित करण्यात आलेल्या ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’ वर दोन उपाध्यक्ष यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
त्यास अनुसरून रत्नागिरी जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी भाजपचे नेते व माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते व माजी मंत्री दीपक केसरकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
या दोन्ही निवडीबद्दल रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. डॉक्टर विनय नातू यांचे अनेक पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 13-06-2026














