प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावर पोलिसांचा छापा; दुचाकीसह ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
दापोली: Dapoli Drugs Seized | दापोली शहरात अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे. दापोलीत वारंवार छोट्या-मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ पकडण्याच्या घटना उघडकीस येत असतानाच, काल पुन्हा एकदा सोळा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. सुसंस्कृत दापोलीतील युवक व्यसनांच्या आधीन होऊन येथील युवाशक्ती कमकुवत तर होत नाही ना, अशी भीती या सातत्यपूर्ण कारवायांमुळे स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
प्रांत कार्यालयाजवळ पोलिसांची धडक कारवाई
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ही कारवाई दिनांक ११ जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दापोली येथील प्रांत कार्यालयासमोरून जाणाऱ्या रस्त्याच्या लगत संशयास्पद हालचालींवर पोलिसांनी पाळत ठेवली होती. या ठिकाणी केलेल्या छाप्यात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.
गांजा आणि दुचाकीसह ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
याप्रकरणी पोलिसांनी रेहाना जमिर काझी (वय ५०, रा. रामराजे कॉलेजसमोर, ता. दापोली) आणि समीर मोहमद शेख (वय ४६, रा. कोकंबाआळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांना ताब्यात घेतले आहे. संशयितांच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची एक्सेस दुचाकी गाडी (आरटीओ नोंदणी क्रमांक एमएच/०८/बीजे/१९१२) हिच्या डिकीची तपासणी केली असता, त्यात सोळा हजार रुपये किमतीचा काळपट रंगाचा गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाचे एकूण वजन ८०० ग्रॅम आहे. पोलिसांनी १६,००० रुपयांचा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली ५०,००० रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ६६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या खळबळजनक प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संशयितांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. (NDPS) कायदा कलम ८ (क), २० (ब) आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली शहरात अमली पदार्थांचे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे, याचा छडा लावण्यासाठी शासकीय तपास यंत्रणांकडून आता पुढील सखोल तपास केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 13-06-2026














