चिपळूणच्या जंगलात अस्तित्व असल्याचे पुन्हा सिद्ध
चिपळूण: Mouse Deer Chiplun | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात वन्यजीवप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. भारतातील सर्वात छोटे हरीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ‘माऊस डियर’चे (Indian Chevrotain) चिपळूण शहरात दर्शन झाले आहे. या दुर्मिळ प्राण्याच्या वावरामुळे स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
घरामागील कंपाउंडच्या भिंतीजवळ लपला होता प्राणी
मिळालेली माहितीनुसार, चिपळूण येथील डी.बी.जे. (D.B.J. College) महाविद्यालयाच्या परिसराजवळ राहणारे बाळकृष्ण शंकर पालकर यांना त्यांच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या कंपाउंडलगतच्या भिंतीजवळ हे हरीण लपून बसलेले आढळले. ‘माऊस डियर’ हा प्रामुख्याने निशाचर (घोर अंधारात वावरणारा) प्राणी असल्याने तो केवळ रात्रीच्या वेळीच अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. दिवसा मानवी वस्तीत किंवा उजेडात त्याचे दर्शन होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.
चिपळूण परिसरात यापूर्वीही झाली आहे नोंद
चिपळूण शहरात किंवा त्याच्या आसपास माऊस डियर आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील चिपळूणमधील कचरा मैदान परिसरात सकाळच्या सुमारास डॉ. विक्रम घाणेकर यांना या माऊस डियरचे दर्शन झाले होते, तशी अधिकृत नोंदही वन्यजीव विभागाकडे आहे. या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे चिपळूणच्या आजूबाजूला असलेल्या घनदाट जंगल भागात या अत्यंत दुर्मिळ वन्यजीवाचे नैसर्गिक अस्तित्व आणि अधिवास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
वन्यजीव अभ्यासकांकडून संरक्षणाचे आवाहन
वन्यजीव अभ्यासक आणि तज्ज्ञांच्या मते, माऊस डियर हा आकाराने अत्यंत लहान, निसर्गाने अतिशय भित्रा आणि मानवी पाऊलवाटांपासून नेहमी दूर राहणारा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. जंगलांची होणारी कत्तल आणि मानवी हस्तक्षेपामुळे या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, अशा दुर्मिळ वन्यजीवांचे तातडीने संरक्षण व संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 13-06-2026














