१ जुलैपासून सुरू होणार नवीन सत्र; प्रशिक्षणानंतर सागरी नौकांवर ‘खलाशी’ म्हणून रोजगाराची सुवर्णसंधी
रत्नागिरी: Ratnagiri Marine Fisheries Training | कोकणातील तरुण मच्छिमारांसाठी रोजगाराची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. मत्स्य व्यवसाय विभागामार्फत आयोजित सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण रत्नागिरी येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात १ जुलैपासून सुरू होत आहे. या ६ महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र युवकांनी २९ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी आणि पात्रता निकष
या प्रशिक्षणासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून खालीलप्रमाणे नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत:
- कालावधी: ६ महिने (१ जुलै ते ३१ डिसेंबर).
- वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे (सोबत ओळखपत्र व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे आवश्यक).
- शैक्षणिक पात्रता: किमान चौथी पास (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे आवश्यक).
- अनुभव: उमेदवार क्रियाशील मच्छिमार असावा व त्याला किमान १ वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.
- शिफारस: विहित नमुन्यातील अर्जावर स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस असणे बंधनकारक आहे.
प्रशिक्षणाचे फायदे आणि रोजगाराच्या संधी
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सागरी नौकांवर त्यांच्या पात्रतेनुसार ‘खलाशी’ म्हणून नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय, राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत योजनेतून अर्थसाहाय्य (कर्ज व अनुदान) मिळवून स्वतःची मच्छिमारी नौका बांधणेही उमेदवारांना शक्य होणार आहे.
अर्ज कुठे आणि कसा करावा?
इच्छुक युवकांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधल्यास त्यांना विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून दिला जाईल. हा अर्ज स्वहस्ताक्षरात संपूर्ण भरून, त्यावर मच्छिमार संस्थेची शिफारस घ्यावी. त्यानंतर २९ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालयाने दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर, ईमेलवर किंवा थेट सादर करावा.
संपर्क कार्यालय: अधिक माहितीसाठी आणि अर्ज मिळवण्यासाठी ‘मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी’, पेठकिल्ला, रत्नागिरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:42 13-06-2026














