रत्नागिरी: Ratnagiri Arogya Mandir Bus Accident | रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या आरोग्य मंदिर बस स्टॉपजवळ एसटी बस आणि ॲम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) यांच्यात झालेल्या अपघाताप्रकरणी अखेर एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ जून रोजी घडलेल्या या अपघातानंतर १२ जून रोजी उशिरा रात्री रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
लिंक रोडवरून रस्ता ओलांडताना झाली धडक
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास चालक सुहास शंकर सनगरे (वय ४४) हे आपली फोर्स टेंपो ट्रॅव्हलर ॲम्ब्युलन्स (क्रमांक MH 08 AP 8836) घेऊन पॉवर हाऊस ते आरोग्य मंदिर लिंक रोडवरून मजगाव रोडच्या दिशेने जात होते. ही ॲम्ब्युलन्स आरोग्य मंदिर बस स्टॉपजवळून रस्ता ओलांडत (क्रॉस करत) असतानाच, मारुती मंदिर ते साळवी स्टॉप मार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने (क्रमांक MH 20 BL 2587) ॲम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली.
बीडमधील मूळ रहिवासी असलेल्या बस चालकावर गुन्हा
या अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटी बसचे चालक रविकांत नानासाहेब मिसाळ (वय ३८, सध्या रा. श्रीनगर, खेडशी; मूळ रा. आंबेजोगाई, बीड) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शरद बाबल्या कांबळे यांनी याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली आहे. आरोपी चालकाने आपली एसटी बस सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे, अविचाराने आणि मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवल्यामुळेच हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
कायदेशीर कलमांनुसार तपास सुरू
या अपघातप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या धडकेत वाहनांचे किती नुकसान झाले आणि कोणी जखमी झाले आहे का, याबाबतचा पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 13-06-2026














