१५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने दुकानांमध्ये गर्दी
गणपतीपुळे: School Material Price Hike Ratnagiri अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांसाठी गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शालेय साहित्याच्या दरात तब्बल २० ते ४० टक्क्यांनी मोठी वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.
महागाईमुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले
दोन महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये असला, तरी वाढत्या महागाईमुळे पालकांचे घरगुती व आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. शालेय साहित्याच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने पालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. केवळ वह्या-पुस्तकेच नाही, तर विविध प्रकारची दप्तरे, कंपास पेटी, वॉटर बॉटल आणि शाळांचे गणवेश (युनिफॉर्म) यांचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
कार्टून कॅरेक्टर असलेल्या वस्तूंना विद्यार्थ्यांची पसंती
बाजारपेठेत यंदा नवीन दप्तरे, वह्या, पुस्तके, कार्टून्सनी सजवलेली कंपासपेटी, रंगीबेरंगी डबे आणि पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी लहान मुले पालकांसोबत उत्साहाने दुकानांमध्ये जात आहेत. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन उत्पादक कंपन्यांनी ‘छोटा भीम’, ‘बार्बी’ आणि इतर लोकप्रिय कार्टून पात्रांची चित्रे असलेले साहित्य बाजारात आणले असून, या वस्तूंना विद्यार्थ्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
‘झेडपी’ची शाळा भारी! पालकांमध्ये उमटतात प्रतिक्रिया
जिल्ह्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये ‘समग्र शिक्षा अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट आणि मोजे पुरवले जातात. मात्र, या उलट खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शालेय शुल्कासह (फीस) सर्व साहित्याचा अवाढव्य खर्च स्वतःच करावा लागत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात शालेय खर्चाची झळ सहन करताना, “आपली झेडपीची (जिल्हा परिषद) शाळाच भारी!” अशी हतबल प्रतिक्रिया खाजगी शाळांमधील अनेक पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:12 13-06-2026














