Konkan Railway Monsoon : ‘कोकण रेल्वे’चे मान्सून वेळापत्रक आजपासून लागू! प्रवासी सुरक्षेसाठी महामंडळाचे सूक्ष्म नियोजन

सुरक्षेसाठी ताशी ४० किमी वेगाचे निर्देश, तर आपत्कालीन वैद्यकीय व्हॅन सज्ज

नवी मुंबई / सीबीडी बेलापूर: Konkan Railway Monsoon वेळापत्रक येत्या १५ जूनपासून ते २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा निसर्गाच्या लहरीपणामुळे रेल्वे मार्गावर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कोकण रेल्वेचे चेअरमन संतोषकुमार झा यांनी या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. या कालावधीत मुसळधार पावसामुळे दृश्यतामान (व्हिजिबिलिटी) कमी झाल्यास रेल्वे ताशी ४० किलोमीटर वेगाने चालवण्याचे स्पष्ट निर्देश लोको पायलटला देण्यात आले आहेत. या पत्रकार परिषदेला मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टी झाल्यास रेल्वे थांबवणार; एसटी महामंडळाची मिळणार मदत

पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वेने काही कडक नियमावली तयार केली आहे. लोहमार्गावर १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाणी साचलेले असल्यास रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी तात्काळ थांबवण्यात येणार आहे. पाणी ओसरल्यानंतरच थांबलेल्या रेल्वे पुन्हा मार्गक्रमण करतील, अशा सूचना लोको पायलटला देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अतिवृष्टी किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची मदत घेतली जाणार आहे. प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी तशी आगाऊ तजवीज करण्यात आली आहे.

ऑपरेशन थिएटरयुक्त स्वयंचलित वैद्यकीय व्हॅन तैनात

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर कोणतीही दुर्घटना घडू नये याची पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. मार्गावरील सर्वच स्थानकांवर आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे आणि प्राथमिक उपचारांचे साहित्य उपलब्ध करण्यात आलेले आहे. कोणत्याही गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी रत्नागिरी आणि वेर्णा (गोवा) या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये स्वयंचलित वैद्यकीय व्हॅन (Accident Relief Medical Van) २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे. या विशेष व्हॅनमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर उपलब्ध असणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत जखमींवर घटनास्थळीच तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.

दरड प्रवण क्षेत्रांवर ६५७ कर्मचारी तैनात; जाळ्या आणि गॅबियन वॉलचे कवच

भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मार्गावर विशेष तांत्रिक उपाययोजना केल्या आहेत. पावसाळ्यात मार्गावर २४ तास नजर ठेवण्यासाठी ६५७ प्रशिक्षित कर्मचारी धोकादायक ठिकाणी सज्ज असणार आहेत. दरड कोसळण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या डोंगराळ भागांमध्ये लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच, रेल्वे मार्गावर दरड आणि मोठे दगड येऊ नयेत यासाठी काही ठिकाणी दरडींची कटिंग (Hill Cutting) करण्यात आली असून, संवेदनशील वळणांवर संरक्षक गॅबियन वॉल (Gabion Walls) बांधण्यात आल्या आहेत.

नऊ स्थानकांवर पर्जन्यमापक यंत्रे; सर्व ७२ स्थानके सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

कोकण रेल्वे मार्गावर एकूण ७२ रेल्वे स्थानके असून सुरक्षेचा उपाय म्हणून या सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. याशिवाय, मार्गावर नेमका किती पाऊस पडत आहे आणि परिस्थिती किती गंभीर आहे, याची अचूक माहिती मिळण्यासाठी एकूण नऊ स्थानकांमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रे (Rain Gauges) बसवण्यात आली आहेत.

प्रतिसाद अभावी यंदा पावसाळी ‘रो-रो’ सेवा बंद

विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील चाकरमान्यांच्या प्रवासी हलक्या वाहनांसाठी कोकण रेल्वेने ‘कार रो-रो’ (RO-RO) सेवा सुरू केली होती. मात्र, मागील काही काळात या सेवेला प्रवाशांकडून अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे वाहतूक खर्च आणि मागणीचा विचार करून यंदा ही पावसाळी कार रो-रो सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे चेअरमन संतोषकुमार झा यांनी यावेळी स्पष्ट केले.

रेल्वेच्या महसुलात होणार मोठी वाढ; २२ हजार कोटींचे टेंडर्स प्राप्त

कोकण रेल्वे केवळ अंतर्गत मार्गावरच नव्हे, तर देशात आणि विदेशात विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर यंदा कोकण रेल्वे प्रशासनाला सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे नवीन टेंडर (कंत्राट) मिळाले आहेत. या मोठ्या प्रकल्पांमुळे येत्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेच्या एकूण महसुलात आणि नफ्यात घसघशीत वाढ होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:50 15-06-2026