आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरू
साखरपा (ता. संगमेश्वर): संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील सकपाळवाडीमध्ये शनिवारी दुपारी एका २७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची Sakharpa Suicide Case उघडकीस आली आहे. श्रद्धा अशोक सकपाळ (वय २७) असे मयत तरुणीचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण साखरपा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेचा तपशील
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रद्धा सकपाळ यांनी घराशेजारील वाड्यातील लाकडी वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ साखरपा पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस प्रशासनाची घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, महिला हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील तसेच साखरपा पोलीस पाटील शैलजा पवार आणि उपसरपंच शशिकांत लिंगायत यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी देखील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट
तरुणीने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 15-06-2026














