रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद, तपास सुरू
रत्नागिरी: Dhamanse Youth Suicide | रत्नागिरी तालुक्यातील धामणसे हटवाडी येथे एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवार १७ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणाने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रात्री जेवण करून खोलीत झोपायला गेला होता तरुण
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक बाळकृष्ण पवार (वय ३५ वर्षे, रा. धामणसे हटवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अशोक हा नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्रीचे जेवण आटोपून आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला होता. रात्रीच्या वेळी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
सकाळी नवीन घरातील छताला आढळला मृतदेह
बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांना अशोक पवारांचा मृतदेह नवीन घरातील छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अत्यंत गंभीर स्थितीत आढळून आला. हा प्रकार समोर येताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक ग्रामस्थांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना दिली.
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत नोंद; अधिक तपास सुरू
या दुर्दैवी घटनेबाबत सुधाकर शांताराम पवार (रा. धामणसे हटवाडी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृत खबर दिली आहे. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथक करत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 18-06-2026














