अतिरिक्त वेळेत फेरान टॉरेसने डागलेला गोल ठरला निर्णायक; लिओनेल मेस्सीचे सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगल
FIFA World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात लाल जर्सीतील स्पेनने ऐतिहासिक कामगिरी करत दुसऱ्यांदा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. अमेरिकेच्या न्यूजर्सी येथील मेटलाईफ स्टेडियममध्ये पार पडलेल्या या रोमांचक सामन्यात स्पेनने बलाढ्य अर्जेन्टिनाचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला. तब्बल १६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्पेनने पुन्हा एकदा फिफा विश्वचषकाचा मानकरी होण्याचा बहुमान मिळवला. अतिरिक्त वेळेत बदली खेळाडू फेरान टॉरेसने केलेला गोल स्पेनच्या या ऐतिहासिक विजयात सर्वाधिक निर्णायक ठरला.
संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी अत्यंत चुरशीचा आणि अप्रतिम खेळ दाखवला. निर्धारित ९० मिनिटांच्या वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. परंतु, अतिरिक्त वेळेत अर्जेन्टिनाचा भक्कम बचाव भेदण्यात स्पेनच्या आक्रमकांना यश आले. सामन्याच्या १०६ व्या मिनिटाला फेरान टॉरेसनं शानदार गोल नोंदवत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांच्या हस्ते स्पेनचा कर्णधार रॉड्रिगोने विश्वचषक स्वीकारला.
मेस्सीला अश्रू अनावर; गोलरक्षक उनाई सिमॉन ठरला गोल्डन ग्लोव्हचा मानकरी
अंतिम सामन्यातील या पराभवानंतर अर्जेन्टिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी कमालीचा भावूक झालेला दिसला. २०२२ मध्ये अर्जेन्टिनाला चषक जिंकवून देणाऱ्या मेस्सीने या स्पर्धेत आठ गोल करत संघाला फायनलपर्यंत पोहोचवले होते, मात्र स्पेनच्या मजबूत बचावापुढे अर्जेन्टिनाचे आक्रमण फिके पडले. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने सामन्यानंतर मेस्सीच्या डोळ्यात अश्रू तरळले. या स्पर्धेत १० गोल करणारा फ्रान्सचा किलियन एमबाप्पे ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरला, ज्यामुळे मेस्सीची ही संधीही हुकली.
दुसरीकडे, स्पेनच्या या विश्वविजयात गोलरक्षक उनाई सिमॉनने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण स्पर्धेतील आठ सामन्यांमध्ये अवघा एक गोल स्वीकारणाऱ्या सिमॉनने अंतिम फेरीतही अर्जेन्टिनाच्या आक्रमणासमोर मजबूत भिंत उभारली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला ‘गोल्डन ग्लोव्ह’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्पेनच्या या दुसऱ्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर राजधानी माद्रिदसह बार्सिलोना आणि सेव्हियामध्ये हजारो चाहत्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार जल्लोष केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 20-07-2026














