पालगड येथे होणार ‘पुस्तकांचे गाव’; रत्नागिरीत पुण्यानंतरचा दुसरा मोठा पुस्तक महोत्सव सुरू करणार
रत्नागिरी:
Marathi Bhasha Sangrahalaya Ratnagiri प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात तब्बल एक एकर क्षेत्रावर २५ कोटी रुपये खर्चून भव्य मराठी भाषा संग्रहालय उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली. याशिवाय दापोली तालुक्यातील पालगड या साने गुरुजींच्या जन्मगावी ‘पुस्तकांचे गाव’ हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. रत्नागिरीत आयोजित मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि स्थानिक साहित्यिकांसोबत पार पडलेल्या संवाद बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बोलीभाषा संशोधन केंद्र आणि शब्दकोश दालन
रत्नागिरीत साकारल्या जाणाऱ्या या भाषा संग्रहालयाच्या स्वरूपाबाबत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, या १ एकर परिसरातील भाषा संग्रहालयामध्ये मराठीच्या विविध बोलीभाषांवर सखोल संशोधन करण्यासाठी ‘बोलीभाषा संशोधन केंद्र’, भव्य ‘पुस्तक विक्री केंद्र’ आणि ‘शब्दकोश निर्मितीचे स्वतंत्र दालन’ उभारण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील प्रसिद्ध पुस्तक महोत्सवाच्या धर्तीवर पुण्यानंतरचा राज्यातील दुसरा मोठा ‘पुस्तक महोत्सव’ रत्नागिरीत सुरू केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Marathi Bhasha Sangrahalaya Ratnagiri: प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी
मराठी भाषेच्या अधिक प्रभावी संवर्धनासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ‘मराठी भाषा विभाग’ हे स्वतंत्र कार्यालय स्थापन केले जाणार असून, त्या ठिकाणी स्वतंत्र ‘मराठी भाषा अधिकाऱ्याची’ नियुक्ती केली जाईल. याशिवाय, मुंबईतील नरिमन पॉइंट येथे १०० कोटी रुपये खर्चून भव्य ‘मराठी भाषा भवन’ आणि नवी मुंबईतील ऐरोली येथे ४० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक ‘संशोधन केंद्र’ उभारले जात असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
बैठकीस प्रमुख साहित्यिकांची उपस्थिती
रत्नागिरीत पार पडलेल्या या आढावा व संवाद बैठकीला साहित्यिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र साहित्य संस्कृती संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, मराठी भाषा समिती सदस्य प्रकाश देशपांडे, गजानन पाटील, तसेच विश्वकोश निर्मिती मंडळ तथा राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांचा समावेश होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 28-07-2026














