प्रतिकूल हवामानात कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या जवानांच्या सुरक्षेसाठी उपक्रम; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते वितरण
रत्नागिरी:
Ratnagiri Police Home Guard Raincoat Distribution उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सागरी सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच विविध संवेदनशील बंदोबस्ताच्या ठिकाणी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने पावसाळी रेनकोटचे वितरण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान हा उपक्रम राबवण्यात आला.
पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांच्या हस्ते वितरण
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठकीत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या शुभहस्ते होमगार्ड जवानांना या रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात सुरक्षेची काळजी घेत अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावता यावे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कार्य
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, किनारपट्टीवरील प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक परिस्थितीतही होमगार्ड जवान सागरी सुरक्षा, किनारपट्टीवरील गस्त तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत असतात. त्यांच्या या समर्पणाची दखल घेत जवानांना सुरक्षित आणि कार्यक्षम वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाने हा पुढाकार घेतला.
Ratnagiri Police Home Guard Raincoat Distribution: जवानांच्या योगदानाचे कौतुक व सतर्कतेच्या सूचना
बैठकीदरम्यान उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या साक्षीने पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी होमगार्ड जवानांच्या कामगिरीचे आणि योगदानाचे मनापासून कौतुक केले. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी होमगार्ड जवानांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, असे ते म्हणाले. तसेच पावसाळ्यात स्वतःच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेत अधिक जबाबदारीने व दक्षतेने कर्तव्य बजावण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी जवानांना दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 28-07-2026














