मुंबई, पुणे आणि दिवा येथून सुटणार विशेष ट्रेन्स; १ ऑगस्टपासून बुकिंग सुरू
Ganpati Special Train News: गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना मोठा दिलासा देत मध्य रेल्वेने २४६ विशेष गाड्या सोडण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. श्रावण महिन्याच्या सुरुवातीसोबतच मुंबई आणि पुण्यातील चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. कोकणात जाणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई, पुणे आणि दिवा येथून कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि मडगावसाठी या विशेष ट्रेन्सची आखणी केली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या २४६ गाड्यांमध्ये वातानुकूलित (AC), शयनयान (Sleeper) आणि सामान्य अनारक्षित डबे असलेल्या १८४ मिश्र विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ६२ पूर्णतः अनारक्षित मेमू (MEMU) विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ९८ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून ७६ फेऱ्या आणि पुणे येथून १० फेऱ्या चालवल्या जातील.
प्रमुख गाड्यांची वेळापत्रके आणि मार्ग
१. CSMT – सावंतवाडी रोड दैनिक विशेष (३२ सेवा):
- गाडी क्र. 01103: ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान CSMT येथून दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
- गाडी क्र. 01104: १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान सावंतवाडी येथून पहाटे ०४:३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १६:४० वाजता CSMT पोहोचेल.
२. CSMT – सावंतवाडी रोड दैनिक विशेष (३४ सेवा):
- गाडी क्र. 01151: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान CSMT येथून मध्यरात्री ००:२५ वाजता सुटेल आणि दुपारी १४:२० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
- गाडी क्र. 01152: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान सावंतवाडी येथून दुपारी १५:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:३५ वाजता CSMT पोहोचेल.
३. CSMT – रत्नागिरी दैनिक विशेष (३२ सेवा):
- गाडी क्र. 01153: ११ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान CSMT येथून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि रात्री २०:२५ वाजता रत्नागिरी पोहोचेल.
- गाडी क्र. 01154: १२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान रत्नागिरी येथून पहाटे ०४:०० वाजता सुटेल आणि दुपारी १३:३० वाजता CSMT पोहोचेल.
४. LTT – सावंतवाडी रोड दैनिक विशेष (३४ सेवा):
- गाडी क्र. 01171: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान LTT येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि रात्री २१:०० वाजता सावंतवाडी पोहोचेल.
- गाडी क्र. 01172: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान सावंतवाडी येथून रात्री २२:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता LTT पोहोचेल.
५. LTT – रत्नागिरी (आठवड्यातून ५ दिवस) (२२ सेवा):
- गाडी क्र. 01167: १२ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान (मंगळ, बुध, गुरू, शनि, रवि) LTT येथून रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:०० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
- गाडी क्र. 01168: १३ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान (बुध, गुरू, शुक्र, रवि, सोम) रत्नागिरी येथून दुपारी १५:१५ वाजता सुटेल आणि मध्यरात्री ००:४० वाजता LTT पोहोचेल.
६. पुणे – रत्नागिरी विशेष गाड्या (१० सेवा):
- गाडी क्र. 01445/01446 (AC): १५ व २२ सप्टेंबर रोजी मंगळवारी पुण्याहून मध्यरात्री ००:२५ वाजता सुटेल आणि सकाळी ११:५० वाजता रत्नागिरी पोहोचेल.
- गाडी क्र. 01447/01448: १२, १९ व २६ सप्टेंबर रोजी शनिवारी पुण्याहून मध्यरात्री ००:२५ वाजता सुटेल.
७. दिवा – खेड आणि दिवा – चिपळूण मेमू अनारक्षित गाड्या (६२ सेवा):
- दिवा – खेड (गाडी क्र. 01155/01156): ११ ते २७ सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी ०७:१५ वाजता दिवा येथून सुटेल.
- दिवा – चिपळूण (गाडी क्र. 01133/01134): ११ ते २७ सप्टेंबर दरम्यान रोज दुपारी १३:४० वाजता दिवा येथून सुटेल.
तिकीट आरक्षण आणि वेळ
गणपती विशेष आरक्षित गाड्यांचे तिकीट आरक्षण सर्व पीआरएस (PRS) केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या (www.irctc.co.in) संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे:
- १ ऑगस्ट २०२६: गाडी क्रमांक 01153, 01445, 01167 आणि 01447 साठी बुकिंग सुरू होईल.
- २ ऑगस्ट २०२६: गाडी क्रमांक 01165 आणि 01185 साठी आरक्षण खुले होईल.
- ३ ऑगस्ट २०२६: गाडी क्रमांक 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131 साठी बुकिंग सुरू होईल.
अनारक्षित डब्यांसाठी युटीएस (UTS) प्रणाली आणि ‘रेलवन’ (RailOne) ॲपद्वारे तिकिटे उपलब्ध राहतील. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:10 28-07-2026














