वेतोशी फाटा येथे पोलिसांची कारवाई; ५ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त
Ratnagiri Crime News: पशुवैद्यकीय तपासणी न करता तसेच पाणी व खाद्य न देता तीन गावठी बैलांना वाहनात दाटीवाटीने बांधून अत्यंत यातनादायी पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वेतोशी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, महेश रामदास कडू (वय ३४, रा. देवरुख माळवाशी, ता. संगमेश्वर) आणि योगेश गजानन म्हादे (वय ३४, रा. पांगरी मोठीवाडी, ता. संगमेश्वर) हे दोघे महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो (क्रमांक MH-08-W-3385) मधून तीन गावठी बैलांची वाहतूक करत होते. वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसताना, बैलांची पशुवैद्यकीय तपासणी न करता आणि त्यांना अन्न-पाणी न देता अत्यंत निष्काळजीपणे व क्रूरतेने दोरीने बांधून नेले जात असल्याचे तपासात समोर आले.
या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी ५ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ५ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो आणि अनुक्रमे १३ हजार, ८ हजार व १० हजार रुपये किमतीच्या तीन गावठी बैलांचा समावेश आहे.
या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण शांताराम रांबाडे (वय ४८, रा. वेतोशी वरचीवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४५/२०२६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(अ), (ड), (ई), (फ), (एच) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ अन्वये कारवाई करण्यात आली असून, रत्नागिरी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 28-07-2026














