Ratnagiri News: श्री देवी भगवती मंदिर किल्ला येथे उद्या ‘बळ उत्सव’; असा असेल परडीचा पारंपरिक मार्ग

भगवती मंदिरात उत्सवाची तयारी पूर्ण; दोन्ही परड्यांचे सीमा पूजन

Ratnagiri News: रत्नागिरीचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या किल्ले रत्नागिरी येथील प्रसिद्ध ‘श्री देवी भगवती मंदिरात’ येत्या बुधवारी, २९ जुलै २०२६ रोजी पारंपरिक ‘बळ उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली असून, नेहमीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

बुधवारी दुपारी ठीक १२:०० वाजता श्री देवी भगवती मंदिरातून बळीच्या दोन पारंपरिक परड्या बाहेर पडतील. यानंतर धार्मिक विधी आणि गार्हाणे घालून दोन्ही परड्या आपापल्या निर्धारित मार्गाने सीमेकडे मार्गस्थ होतील.

बळ उत्सवाचा असा आहे परडी मार्ग:

  • पहिली परडी (मिऱ्या बंदर सीमा मार्ग): दुपारी १२ वाजता भगवती मंदिरातून निघून पहिली परडी हनुमान पार, खन्ना कंपनी, हनुमान वाडी, ऐतिहासिक बोगदा आणि राम मंदिर मार्गे मार्गस्थ होईल. त्यानंतर पुढे मिऱ्या बंदर येथील ‘पंधरा माड’ या सीमेवर पोहोचेल.
  • दुसरी परडी (के. सी. जैन मारुती मंदिर सीमा मार्ग): दुसरी परडी भागेश्वर मंदिर, बोगदा, राम मंदिर, मांडवी समुद्रकिनारा, मांडवी नाका, तेली आळी, एस. टी. स्टँड आणि जयस्तंभ मार्गे शहरात प्रवेश करत के. सी. जैन मारुती मंदिर येथील सीमेवर जाईल.

सीमेवर पोहोचल्यानंतर परडी तिथे ठेवून पारंपरिक पद्धतीने गार्हाणे घातले जाईल. यानंतर सर्व धार्मिक विधी पूर्ण करून ही परडी पुन्हा श्री देवी भगवती मंदिर येथे परत आणली जाईल. या बळ उत्सवासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 28-07-2026