Ratnagiri Railway News: CSMT-रत्नागिरी गणपती विशेष ट्रेनला कडवई स्थानकावर थांबा देण्याची मागणी

चिपळूण-संगमेश्वर रेल्वे ग्रुपतर्फे कोकण रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा

Ratnagiri Railway News: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची आणि गणेशभक्तांची मोठी गर्दी लक्षात घेता, गाडी क्रमांक ०११५३/०११५४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी (CSMT-Ratnagiri) या गणपती विशेष ट्रेनला कडवई रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून ही मागणी लावून धरली आहे.

कडवई आणि परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांना, तसेच परगावाहून येणाऱ्या गणेशभक्तांना ही विशेष गाडी कडवई येथे थांबल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या भागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेण्यासाठी इतर दूरच्या रेल्वे स्थानकांवर जावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातोच, शिवाय रिक्षा व इतर वाहनांसाठी अतिरिक्त आर्थिक खर्चही सोसावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी किमान दोन मिनिटांचा प्रायोगिक थांबा मंजूर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यापूर्वी सन २०२३ मध्ये हीच ट्रेन जेव्हा दिवा-रत्नागिरी विशेष गाडी म्हणून धावत होती, तेव्हा स्थानिक नेते श्री. जितेंद्र चव्हाण यांनी आंदोलन करून कडवई स्थानकावर थांबा मिळवून दिला होता. मात्र, नंतरच्या काळात या गाडीचा मार्ग बदलून ती CSMT-रत्नागिरी करण्यात आली. सध्या या गाडीला कामथे रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे, त्याच धर्तीवर कडवई स्थानकावरही थांबा मिळणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रेमींनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या काळातील प्रवाशांची वाढती संख्या, कडवई परिसरातील चाकरमान्यांची गरज आणि आर्थिक भुर्दंड लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी आणि गाडी क्र. ०११५३/०११५४ ला कडवई स्थानकावर थांबा जाहीर करावा, अशी मागणी चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 28-07-2026