दुचाकी नाल्यात कोसळून तरुणीचा मृत्यू

वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ दुर्घटना; रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप

Dapoli Accident News: दापोली-खेड महामार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. दापोलीहून खेडच्या दिशेने जाणाऱ्या दोन तरुणींचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. या भीषण दुर्घटनेत एका २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

या अपघातात सेजल पांडुरंग भागवत (वय २२) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, वैष्णवी चंद्रकांत अहिरे ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील ग्रामस्थांनी व स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी अथक प्रयत्न करून जखमी वैष्णवीला नाल्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा व मदतकार्य पार पाडले.

दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महामार्गाचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम, मोऱ्यांजवळ साचलेला गाळ आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळेच हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदारावर तत्काळ ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी आता परिसरातून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 28-07-2026