Ratnagiri: आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात रत्नागिरीत रिपांइचा धडक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

समाजहिताच्या विरोधात जाणारे निर्णय खपवून घेतले जाणार नाहीत; आठवले गटाचा सरकारला इशारा

Ratnagiri News: अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ रत्नागिरीत संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रीतम रूके यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आरक्षणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि समाजहिताच्या विरोधात जाणारे निर्णय खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.

राज्य सरकारतर्फे बदर समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा कुटील डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजात फूट पडण्याची दाट शक्यता असून, यामुळे सामाजिक न्याय, समता आणि भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशालाच मोठा धक्का पोहोचू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण हे ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी होते, त्यामुळे यामध्ये उपवर्गीकरण करणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रीतम रूके, विलास कांबळे, विद्याधर कदम, गौरव मर्चंडे, अनिल उरुणकर, किरण पवार, दीपक कांबळे, मधूराम हरी, रामचंद्र कांबळे, जे. टी. लोखंडे, विजय आयरे, प्रदीप पवार आणि मनोहर कदम यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन महसूल सहाय्यकांना सादर केले.

निवेदनात प्रामुख्याने अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय त्वरित थांबवण्याची आणि बदर आयोग कायमचा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जातीच्या घटनात्मक हक्कांचे व आरक्षणाचे पूर्ण संरक्षण व्हावे आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व समाज घटकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात यावी, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली. याशिवाय दिल्लीतील नीट पेपरच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा तीव्र निषेध करत संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सोबतच शासनाने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणीही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लावून धरण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 28-07-2026