बीएलओंच्या अहोरात्र प्रयत्नांना यश; उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांची माहिती
Ratnagiri News: मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे (Voter List Special Deep Revision) काम वेळेत आणि १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ – चिपळूण’ हा संपूर्ण महाराष्ट्रातील पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लिगाडे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली.
या ऐतिहासिक यशाबद्दल बोलताना आकाश लिगाडे म्हणाले की, “अहोरात्र मेहनत घेऊन काम करणाऱ्या सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (BLO) या यशात सिंहाचा वाटा आहे. तसेच, सहाय्यक व अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांपासून ते सर्व कर्मचारी यांच्या एकत्रित सांघिक प्रयत्नांमुळेच चिपळूण मतदारसंघाने राज्यात ही मानाची कामगिरी केली आहे.” विशेष म्हणजे, याआधी मतदारयादीचे १०० टक्के पुनरीक्षण पूर्ण करणारे राज्यातील पहिले गाव बनण्याचा बहुमानही चिपळूण तालुक्यातीलच ‘मौजे टेरव बुद्रुक’ या गावाने पटकावला होता.
चिपळूण मतदारसंघातील आकडेवारी:
- एकूण मतदान केंद्र: ३३६ (चिपळूण आणि संगमेश्वर तालुका मिळून)
- एकूण मतदारसंख्या: २,७१,४३३
- स्त्री मतदार: १,३८,६७५
- पुरुष मतदार: १,३२,७५८
विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान ९०.४० टक्के गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन (Digitization) यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. उर्वरित ९.५६ टक्के प्रपत्रे जमा न होण्यासारखी (Uncollectable) होती, तर २.७९ टक्के प्रपत्रांचे मॅपिंग होऊ शकले नव्हते.
आता येत्या ८ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत बीएलओ पातळीवर उर्वरित कामांची फेरपडताळणी आणि मॅपिंग पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच डिजिटायझेशन झालेल्या सर्व प्रपत्रांची अंतिम तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 28-07-2026














